क्राइमजळगावताज्या बातम्यासामाजिक

शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन !

जळगाव प्रतिनिधी | केळी पिकाच्या विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने खात्यावर जमा करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केळी पिकाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या विम्याच्या रकमेसाठी अनेकदा पाठपुरावा आणि आंदोलने करण्यात आली. मात्र, अद्यापही अनेक शेतकरी विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नाकारल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.

आधीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच केळी पिकाचे नुकसान होऊनही विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. जोपर्यंत पीक विम्याच्या रकमेसंदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, प्रलंबित पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, तसेच इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button