बाजार समितीची थकीत मार्केट फी वसुलीसाठी मोठी कारवाई; २ कोटींच्या थकबाकीचा दावा

जळगाव प्रतिनिधी | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील दालमिल व्यापाऱ्यांकडे थकीत असलेल्या मार्केट फीच्या वसुलीसाठी बाजार समितीने कारवाईला सुरुवात केली आहे.
२०१९ ते २०२१ या कालावधीतील थकीत मार्केट फीच्या वसुलीसंदर्भात बैठक घेण्यात आली. संबंधित व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिल्याची माहिती बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांनी दिली.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात १४०० हून अधिक व्यापारी आहेत. त्यापैकी सुमारे १० ते १५ व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर मार्केट फी थकीत असल्याचे सांगण्यात आले. या व्यापाऱ्यांकडे अंदाजे दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी व्यवहारांचे आवश्यक दप्तर अद्याप बाजार समितीकडे जमा केलेले नसल्याने त्यांनी नेमके किती व्यवहार केले, याचा तपशील मिळविण्यात अडचणी येत असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले. त्यामुळे थकीत रकमेचा नेमका आकडा निश्चित करण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे.
याशिवाय २०२२ पासून आजपर्यंतच्या कालावधीत काही व्यापाऱ्यांकडे मार्केट फी थकीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्या थकबाकीच्या वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परवाना न घेता व्यवसाय करणारे तसेच थकीत मार्केट फी असलेल्या व्यापाऱ्यांनी तातडीने रक्कम भरून बाजार समितीला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती लक्ष्मण पाटील यांनी केले आहे.



