जळगावच्या एसटी ताफ्यात सात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; संख्या ७० वर

जळगाव प्रतिनिधी | जळगावच्या एसटी ताफ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी आणखी सात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या नव्या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या बसेसमुळे जळगाव विभागातील ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची संख्या आता ६३ वरून ७० झाली आहे.
जळगाव विभागात दररोज मोठ्या संख्येने नागरिक एसटी बससेवेचा वापर करतात. ग्रामीण भागासह शहर आणि विविध तालुक्यांना जोडणाऱ्या एसटी सेवेला प्रवाशांकडून मोठी पसंती मिळते. त्यामुळे ताफ्यात नव्या बसेसची भर पडल्याने प्रवाशांना अधिक चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी ही सामान्य माणसाच्या प्रवासाचा विश्वास असल्याचे सांगितले. जळगाव विभागाच्या विकासात एसटीचा वाटा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेत सेवा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. एसटी प्रशासनाने बससेवेचा दर्जा कायम ठेवण्यासोबतच वेळेचे नियोजन आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नव्या सात बसेसच्या समावेशामुळे जळगाव विभागाच्या एसटी ताफ्याला बळ मिळाले असून, आगामी काळात प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.



