क्राइमताज्या बातम्या

भोकर बँक दरोड्याचे धागेदोरे कारागृहापर्यंत! बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग; चौघांना अटक !

जळगाव प्रतिनिधी | भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेल्या धाडसी दरोड्याचे धागेदोरे आता कारागृहापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कारागृहात झालेली ओळख, त्यानंतर जुळलेले संबंध आणि जामिनावर सुटल्यानंतर बँक लुटण्याची आखलेली योजना, असा या गुन्ह्याचा घटनाक्रम तपासात पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर जासक याच्यावर २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील ३ कोटी १७ लाख रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणात आरोप आहे. या प्रकरणात कारागृहात असताना त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली होती. गजानन पवार हा खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. दोघेही जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेत भोकर बँकेवर दरोडा टाकण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे.

त्यानुसार चार संशयितांनी बँकेत प्रवेश केला. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला धमकावण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून एकापाठोपाठ १६ लॉकर उघडून घेण्यात आले. त्यातील सोने आणि रोकड बॅगांमध्ये भरून आरोपींनी पळ काढला. या संपूर्ण प्रकारात आरोपींनी तब्बल ४० ते ४५ मिनिटे बँकेत घालवल्याची माहिती आहे.

दरोड्यानंतर आरोपी धरणगावच्या दिशेने पसार झाले. मात्र, ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केल्याने आरोपींची धावपळ उडाली. चावलखेड्याजवळ काही बॅगा फेकून दिल्यानंतर आरोपी परिसरातील शेतात लपून बसले. दरम्यान, पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आता या प्रकरणात जप्त केलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत, दरोड्यातील अन्य साथीदारांची भूमिका आणि गुन्ह्याच्या नियोजनामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. बँक दरोड्याच्या या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button