भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून डंपरची चोरी: पोलिसात गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी | भडगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून तब्बल २० लाख रुपये किमतीचा डंपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने संधी साधत डंपर लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसिद्धीर किटकुळे सोनवणे (वय ५१, व्यवसाय नोकरी, रा. भडगाव) यांच्या मालकीचा टाटा सिग्मा कंपनीचा डंपर पोलीस लाईन, भडगाव येथून चोरीला गेला आहे. या डंपरची किंमत अंदाजे २० लाख रुपये असून, त्याला नंबर प्लेट नसल्याची नोंद पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत करण्यात आली आहे. डंपरवर ‘न्यू पार्सिंग टायगर नायल व आई’ असे नाव लिहिलेले असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या दरम्यान हा डंपर चोरीला गेल्याचे समोर आले आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय डंपर चोरून नेल्याने भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव करीत आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपी अज्ञात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.



