पाळधी-तरसोद बायपासवर पुन्हा भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!

जळगाव प्रतिनिधी | पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. पाळधी रेल्वे पुलावर एका भरधाव आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात योगेश गजमल राक्षे (रा. आव्हाणे) या तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच योगेश यांचा विवाह झाला होता, या दुर्दैवी घटनेमुळे नवविवाहित पत्नीसह संपूर्ण राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कामावरून घरी परतताना काळाचा घाला
योगेश राक्षे हे आव्हाणे येथील एका खताच्या गोदामात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. नेहमीप्रमाणे काम संपवून ते दुचाकीवरून आपल्या घरी परतत असताना, पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बायपासवरील वाहतूक वळविल्याने अपघातांत वाढ
गेल्या ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी, सर्व अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. या बदलामुळे संबंधित मार्गावरील अपघातांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आकडेवारी ठरतेय चिंताजनक!
जुलै महिन्यापासून आतापर्यंत या मार्गावरील अपघातांच्या तब्बल २५ घटना नोंदवल्या गेल्या असून, यामध्ये १३ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या या प्राणघातक अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात
या अपघातप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.




