धरणगावात घरफोडी; ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव शहरातील मातोश्रीनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने घरातून एकूण ५४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विठ्ठल बच्छाव (वय ३८, व्यवसाय नोकरी), रा. मातोश्रीनगर, धरणगाव यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील ५० हजार रुपयांची रोकड तसेच मुलीच्या गळ्यातील रकमेतून ठेवलेली ४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण ५४ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.



