किनगाव प्रकरणात पडताळणीनंतरच संशयितांना अटक; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर वंचितचे आंदोलन मागे!

यावल प्रतिनिधी | किनगाव येथील दगडफेक प्रकरणात निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. संशयित आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाची खातरजमा केल्यानंतरच अटक केली जाईल, असे लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या मार्गावरून वाद निर्माण झाला होता. धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन जात असताना काही नागरिकांनी विरोध केला. यावेळी पोलिसांशी वाद झाल्यानंतर सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत सात जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, गुन्ह्यातील काही संशयितांचा घटनास्थळी सहभाग नसतानाही त्यांना आरोपी करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामिभा पाटील यांनी केला. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किनगाव दौऱ्यादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
या मागण्यांसाठी मुस्लिम, आदिवासी तडवी आणि मागासवर्गीय समाजबांधवांसह आंदोलन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, एफआयआरमधील संशयितांना अटक करण्यापूर्वी त्यांच्या सहभागाची पडताळणी केली जाईल. किरीट सोमय्या यांच्याबाबतच्या तक्रारीची फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
तसेच गावात प्रक्षोभक वक्तव्ये होऊ नयेत, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात धार्मिक अथवा संघटनात्मक मिरवणुकांना परवानगी देताना मार्ग व स्थानिक परिस्थितीचा सखोल विचार करावा, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन मागे घेतले.



