क्राइमजळगावताज्या बातम्या

शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद: २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त !

जामनेर प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० किलो चोरीचा कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको गाडी जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिंगोळा गावातील शेतकरी सदानंद कैलास जोशी यांच्या शेतातून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री कापूस चोरीला गेला होता. या घटनेनंतर शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या चोरीचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद सोहेल एजाज, सय्यद अनस मेहबूब आणि शेख मोहम्मद अली उर्फ कादर या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून चोरीचा कापूस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली इको गाडी जप्त करण्यात आली.

शेतातील पिकांचे नुकसान होत असताना कापूस चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button