वरणगावात गोळीबाराचा थरार! फुलगाव उड्डाणपुलाजवळ तरुणावर दोन राऊंड फायरिंग !

वरणगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. फुलगाव उड्डाणपुलाखाली दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका २३ वर्षीय डंपर चालकावर गोळीबार करत लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सर्फराज सय्यद हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सर्फराज हा मुक्ताईनगर येथील काजीपुरा परिसरातील रहिवासी आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या नावाने फेक आयडी तयार करून सर्फराजशी चॅटिंग करण्यात आली होती. याच चॅटिंगच्या माध्यमातून त्याला फुलगाव उड्डाणपुलाखाली बोलावण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
तेथे पोहोचल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी मागून येत लोखंडी रॉडने मारहाण केली आणि दोन वेळा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी सर्फराजला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी रुग्णालयात भेट दिली. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.



