रेल्वे ब्रीजच्या खड्ड्यात दुचाकी कोसळून तरुणाचा मृत्यू; दोन मित्र गंभीर जखमी

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वे ब्रीजच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या तब्बल २५ फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात विकी संजय निकम (रा. खडकदेवळा) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित यंत्रणेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. विकी आणि त्याचे दोन मित्र रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जात असताना, अंधारामुळे रेल्वे ब्रीजच्या कामासाठी खोदलेला अंदाजे २५ फूट खोल खड्डा त्यांना दिसला नाही. परिणामी, त्यांची चालती दुचाकी थेट त्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघातात विकी निकम याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे निकम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. काही काळापूर्वीच विकीच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी आणि आईचा एकमात्र आधार हाच तरुण होता. अशा कर्तबगार आणि तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आईसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. रेल्वे ब्रीजच्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी योग्य प्रकाश व्यवस्था, सुरक्षिततेचे उपाय आणि धोक्याची सूचना देणारे फलक (बॅरिकेट्स किंवा वॉर्निंग बोर्ड) लावले होते का? असा गंभीर सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर तिथे योग्य सुरक्षा उपाययोजना असत्या, तर हा जीवघेणा अपघात टाळता आला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.


