म्हसोबा मंदिराजवळ ट्रॅक्टर-दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा दुर्दैवी अंत !

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा-मोंढाळा रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिंदाड येथील समाधान पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसोबा मंदिराजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत समाधान पाटील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे समाधान पाटील यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाचोरा पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अपघाताच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी रस्त्यावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




