वरखेडी-भोजे मार्गावर आयशर पलटी; पोत्यांखाली दबून एकच दुर्दैवी मृत्यू!

पाचोरा प्रतिनिधी | वरखेडी ते भोजे मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, मालाने भरलेली आयशर गाडी पलटी झाल्याने ५५ वर्षीय संभाजी केराप्पा भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वरखेडी गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून भोजेच्या दिशेने जाणाऱ्या आयशर गाडीमध्ये गोदामातील मालाची पोती भरलेली होती. गाडीच्या केबिनमध्ये चालकासह दोन व्यक्ती होत्या, तर संभाजी भाऊ हे गाडीच्या मागील बाजूस पोत्यांवर बसले होते. प्रवासादरम्यान वरखेडीजवळ अचानक गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत संभाजी भाऊ पोत्यांखाली दबले गेले.
अपघाताची माहिती मिळताच वरखेडी आणि सावखेडा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोत्यांखाली अडकलेल्या संभाजी भाऊ यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, समोरून बस आल्याने हा अपघात झाला असावा. मात्र, या कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या एपीआय वर्मा मॅडम यांच्यासह पोलीस कर्मचारी नामदेव इंगळे आणि अतुल पवार घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
संभाजी केराप्पा भाऊ हे पाचोरा येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.




