रावेर पोलिसांची धडक कारवाई; शेतातील वीजतारा चोरी प्रकरणी दोन संशयित जेरबंद

रावेर : शेतातील इलेक्ट्रिक पोलवरील वीजतारा चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत दोन संशयितांना जेरबंद केले आहे. या प्रकरणात सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम वीजतारा चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी शेतातील इलेक्ट्रिक पोलवरील वीजतारा चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी शेतशिवारातील चोरीचा तपास सुरू होता.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला गती दिली. गोपनीय माहितीच्या आधारे १४ ऑक्टोबर रोजी रात्री गस्तीदरम्यान संशयितांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान चोरीच्या वीजतारा काढून विक्री केल्याची माहिती समोर आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय चौधरी करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शेतातील वीजतारा चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




