‘आजची तयारी, उद्याचा पोलीस अंमलदार’! पाळधीत तरुणांना पोलीस भरतीचे धडे

जळगाव प्रतिनिधी | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावे, भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पाळधी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात पाळधी व धरणगाव परिसरातील ३०० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्रांची पूर्तता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मैदानी परीक्षेच्या तयारीसाठी नियमित व्यायाम, सराव आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व उमेदवारांना पटवून देण्यात आले. तसेच लेखी परीक्षेसाठी सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर यासह इतर कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत निधीतून बसविण्यात आलेल्या ११ सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे गावातील महत्त्वाच्या ठिकाणांवर देखरेख ठेवणे शक्य होणार असून गुन्हेगारीला आळा घालण्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
‘आजची तयारी, उद्याचा पोलीस अंमलदार’ या ध्येयाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पोलीस भरती इच्छुक तरुणांना मोठा प्रोत्साहनपर आधार मिळाला आहे. ३०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग हा या शिबिराच्या यशस्वितेचा प्रत्यय ठरला.



