क्राइमजळगावताज्या बातम्या

आकाशवाणी चौकातील उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते.
रवींद्र चौधरी हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आपल्या दुचाकीने कामावर जात होते. दरम्यान, आकाशवाणी उड्डाणपुलावर आल्यावर एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे चौधरी रस्त्यावर कोसळले आणि थेट ट्रकच्या चाкаखाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
रवींद्र यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवारामध्ये मोठा शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. ते घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, तरसोद बायपासची वाहतूक या मार्गावर वळविण्यात आल्यापासून येथील अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील या धोकादायक मार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button