अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई! विनापरवाना वाळूचा डंपर पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा डंपर जळगाव तालुका पोलिसांनी पकडल्याची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईत वाळूसह डंपर असा एकूण ५ लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कानळदा ते जळगाव रस्त्यावर अतराडे पेट्रोलपंपासमोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी अशोक लेलँड कंपनीचा MH-19-Z-3392 क्रमांकाचा डंपर विनापरवाना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात सुमारे दोन ब्रास वाळूची किंमत ४८ हजार ४६० रुपये, तर डंपरची किंमत पाच लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ५ लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चेतन कैलास कोळी (वय २८, रा. इंदिरानगर, भादली, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करीत असून, नोंदीनुसार आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.




