क्राइमजळगावताज्या बातम्या

धक्कादायक : संशयातून पतीकडून पत्नीची हत्या; यावल शहरात खळबळ !

यावल प्रतिनिधी | यावल शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयातून पतीने अवघ्या २० वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, विवाहाला वर्षही पूर्ण झाले नसताना संसाराचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरदीन खान आरिफ खान (वय २१) आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे तिरुपती नगर परिसरात वास्तव्यास होते. सोमवारी कुटुंबातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात पती-पत्नी दोघेच असताना त्यांच्यात वाद झाला. संशयाच्या कारणावरून झालेल्या या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले.

संतापाच्या भरात फरदीन याने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. या हल्ल्यात मशीराबी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती घरातून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या फरदीनला साकळी गावाजवळ ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button