प्रॉपर्टीच्या वादातून तरुणावर गोळीबार; विवेकानंद नगर परिसरात खळबळ!

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अर्जुन रोहिदास राठोड असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागली आहे. जखमी अर्जुनवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन राठोड याचा प्रॉपर्टीच्या कारणावरून काही व्यक्तींशी जुना वाद सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात न्यायालयात दावाही दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. याच वादातून जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयाजवळ रात्रीच्या सुमारास अर्जुन आणि हल्लेखोरांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अर्जुनवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात अर्जुनच्या उजव्या कानाखाली गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या हल्ल्यामागे प्रॉपर्टीचा जुना वाद असल्याचा आरोप जखमी अर्जुनने केला आहे. तसेच, दोन व्यक्तींनी पैसे देऊन आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोपही त्याने केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी तरुणाची विचारपूस केली. गोळीबार करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.




