जामनेरमध्ये दुचाकीच्या बॅगेतून १.१४ लाख गायब; हॉटेलसमोरील चोरीने खळबळ

जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरात दुचाकीला लावलेल्या बॅगेतून तब्बल १ लाख १४ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शिवम हॉटेलसमोर घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अज्ञात चोरट्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर शिवदास लोखंडे (वय ३१, रा. संजयनगर, पाचोरा रोड, जामनेर) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता ते एमएच १९ ईएस ४७११ क्रमांकाच्या दुचाकीसह शिवम हॉटेलसमोर थांबले होते. याच दरम्यान त्यांच्या दुचाकीला लावलेल्या बॅगेतून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रतापसिंग मथुर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




