चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त

चोपडा प्रतिनिधी | चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लासूर गावाच्या पुढे मोटेकर रोडवरील परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयितांकडे अवैध शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचला.
या सापळ्यात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे आणि काडतुसे जप्त केली आहेत.
या कारवाईत साहिल दामू आव्हारे, सौरभ संतुराम मोतीरावे आणि रोहित चंद्रकांत जुंजागर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेली शस्त्रे कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आली होती, याचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच या शस्त्रांचा पूर्वी कोणत्या गुन्ह्यात वापर झाला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.




